बीड - मराठा समाजाला आरक्षण देण्याची या सरकारची नियत नाही. आरक्षण देण्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर मराठा समाज बांधवांनी राज्यभरात मोर्चे काढू नये, यासाठी कोविडचा आधार घेऊन लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. परंतु आता आम्ही शांत बसणार नाही. येत्या 5 जूनला बीडमध्ये मराठा समाज बांधवांसाठी आरक्षण मागणी करत मोर्चा काढणार आहोत. अशी माहिती शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिवसंग्रामचे अनिल घुमरे, सुहास पाटील, मनोज जाधव यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार विनायक मेटे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर समाजामध्ये एक निराशेची भावना होती. हीच भावना घेऊन समाज रस्त्यावर उतरू नये म्हणून सरकारने लॉकडाऊन वाढवले. अगोदर 15 मेपर्यंत असलेले लॉकडाऊन 30 मेपर्यंत केले. मात्र आता समाज शांत राहणार नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात 30 मेपर्यंत शासन काय निर्णय घेते ते पाहून, आम्ही 5 जूनला बीड शहरातून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत मोर्चा काढणार आहोत. विशेष म्हणजे हा मोर्चा पहिल्या मोर्चांप्रमाणे मूक मोर्चा नसणार, असा इशारा देखील विनायक मेटे यांनी यावेळी दिला आहे.
मोर्चामध्ये सर्व जाती, धर्माचे नागरिक सहभागी होणार
एकंदरीतच राज्यात मराठा समाजाबरोबरच इतर समाजाच्या आरक्षणासंदर्भात देखील राज्य सरकार काहीच बोलत नाही, यामुळे आम्ही पाच जूनला काढत असलेल्या मोर्चामध्ये मराठा समाजासह धनगर, लिंगायत, ब्राम्हण, मुस्लिम, समाजाचे नागरिक देखील असणार आहेत. या समाजातील नेत्यांना एकत्र करून आम्ही आरक्षणाची लढाई लढणार आहोत, त्यामुळं हा मोर्चा सर्व समाजाचा असणार आहे. हा मोर्चा मूक नसून सरकारला धारेवर धरणारा असणार आहे. असं देखील या पत्रकार परिषदेत विनायक मेटे यांनी म्हटले आहे.
गावागावात घेणार घोंगडी बैठक
सध्या कोरोनाची बिकट स्थिती आहे हे लक्षात घेऊन, आम्ही गावागावात जाऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत घोंगडी बैठक घेणार आहोत. या बैठकीमधून मराठा समाज बांधवांना या सरकारच्या नाकर्तेपणाचा परिचय करून देणार आहोत, आणि त्यानंतर पाच जूनला बीडमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहोत अशी माहिती मेटे यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात 3190 बालकांना कोरोनाची लागण