बीड - गेवराई तालुक्यातील मादळमोही ग्रामपंचायती अंतर्गत 17 लाख 73 हजार रुपयांच्या शासकीय योजनेच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात मादळमोही येथील माजी सरपंच व संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाला आहे.
2016-17 व 2017-18 या कालावधीत ग्रामपंचायतीला शासनाकडून 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला होता. यातील 17 लाख 77 हजार रुपयांची निधी कामे न करताच लाटल्याचा ठपका संबंधित महिला सरपंच व ग्रामसेवकांवर आहे. याप्रकरणी मादळमोही येथील माजी महिला सरपंच सीमा अनंत व ग्रामसेवक बबन रामराव नागरगोजे यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा गुन्हा गटविकास अधिकारी पंचायत समिती गेवराई येथील सुभाष मावळे यांच्या फिर्यादीवरून दाखल झाला आहे. ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करून 14 व्या वित्त आयोगातून आलेला निधी कामे न करताच लाटला असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
इतर गावातील रेकॉर्डही येणार पुढे
14 व्या वित्त आयोगातून अंतर्गत शासनाने बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. मात्र 2016 -17 मध्ये ग्रामसेवक व तत्कालीन सरपंच यांनी मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार केला असल्याची शक्यता असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भाने गेवराईसह इतर तालुक्यांमधील ग्रामपंचायतींच्या कामांचे पुन्हा एकदा ऑडिट केले जाणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले असून या प्रकारामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.