बीड - कोरोना विषाणू संदर्भात आरोग्य विभागाच्या यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी बीड जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. कोरोना विषाणूच्या संभाव्य रुग्णांसाठी उपलब्ध असलेली यंत्रणा तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वापरण्यासाठी लागणारे साहित्य यासंदर्भात माहिती घेऊन आवश्यक त्या साहित्याच्या उपलब्धतेबाबत क्षीरसागर यांनी सूचनाही दिल्या. यावेळी बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी उपाय योजना संदर्भात सविस्तर माहिती दिली. तसेच बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याबाबत उपाय योजना संदर्भाने सविस्तर चर्चा झाली.
जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासाठी देण्यात आलेला निधी कमी पडला तर, तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही यावेळी आ. क्षीरसागर यांनी सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे वैद्यकीय सेवा करत असताना डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या वैद्यकीय उपकरणांची तत्काळ पूर्तता करण्यासंदर्भातदेखील सुचना दिलेल्या आहेत. आरोग्यसेवेसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही क्षीरसागर यांनी यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांना सांगितले.
बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून व्हेंटिलेटरची संख्या वाढवण्यासाठी काय करता येऊ शकते याबाबत आमदार क्षीरसागर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांची यांच्याशी चर्चा केली. बीड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यासंदर्भात देखील सविस्तर चर्चा यावेळी झाली. याप्रसंगी माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सुनील धांडे जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांची उपस्थिती होती.