बीड - बीड विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार संदीप क्षीरसागर यांनी उमरद जहांगीर येथे जनता दरबार आयोजित केला होता. या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तर काही प्रश्नवर जनता दरबारातच तोडगा काढण्यात आला.
मंगळवारी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जनता दरबारात अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली. यावेळी आमदार साहेब.. गावात स्वस्त धान्य मिळत नाही.. जिल्हा परिषदेच्या शाळेला शिक्षक नाहीत.. रोहित्र नसल्याने गाव महिनाभरापासून अंधारात आहे... तलाठी गावात येत नाहीत.. अशा ढिगभर समस्या गावकऱ्यांनी मांडल्या. या जनता दरबारात संबधित तहसीलदार, कृषीअधिकारी, विधुत अभियंता यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना विविध कामांच्या अमलबजावणी संदर्भात सूचना दिल्या.
संदीप क्षीरसागर म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेची कामे वेळेत करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, जे तलाठी व ग्रामसेवक महिना-महिना गावात येणार नाहीत त्यांना तत्काळ करणे दाखवा नोटीस दाखवून कारवाई करा, असे आदेश आमदार क्षीरसागर यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिले.
यापुढच्या काळात ठराविक लोकांचीच कामे मार्गी लावायचे व सर्वसामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडायचे, असे प्रकार यापुढे चालणार नाहीत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत च्या विविध योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवावी. जर तलाठी ग्रामसेवक गावावर हजर राहणार नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पहिल्यांदाच आमदारांनी गावात येऊन गावातील नागरिकांच्या समस्या ऐकल्या व सोडवण्याचे प्रयत्न केल्यामुळे गावातील नागरिकांनी संदीप क्षीरसागर यांचे कौतुक केले आहे. यावेळी तहसीलदार सचिन खाडे, कृषी विभागाचे दिलीप जाधव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सुजित बडे, विधुत विभागाचे सानप, भारंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर घुमरे, बबन गवते यांची उपस्थिती होती.