गेवराई(बीड)- कोरोनोच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लाॅकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिक आणि मजुरांना सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील गोरगरीब कुटुंबास मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे. याचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना मिळेल यासाठी नियोजन करा, अशा सूचना आमदार लक्ष्मण पवार यांनी तहसीलदार सचिन खाडे यांना केल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या गोरगरीब कुटुंबांना मे महिन्यात सरकारकडून मे महिन्यात प्रति व्यक्ती ५ किलो रेशन मिळणार आहे. त्याप्रमाणे प्रत्येक पात्र कार्डधारकांना मोफतचे रेशन वितरण करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, कार्डधारकांची तक्रार येणार नाही याची दक्षता दुकानदारांनी घ्यावी, अशा सुचना आमदार लक्ष्मण पवार यांनी यावेळी दिल्या. तहसीलदार यांच्याशी व्हिसीद्वारे आढावा घेऊन याबाबत त्यांनी निर्देश दिले.
यांना मिळणार धान्य
यावेळी बोलताना तहसीलदार खाडे म्हणाले, की गेल्या दोन महिन्यात कोरोनोने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली व आपल्या परिवारांची काळजी घ्यावी सरकारने घोषणा केली आहे त्या अनुषंगाने प्राधान्य कुटुंब योजनेतील व अत्योदय योजनेतील कार्डधारकांनाच रेशन मिळणार आहे. तसेच एपीएल कार्डधारकांना मात्र मोफत रेशन मिळणार नाही. त्यांना नेहमीप्रमाणे धान्य पैसे देऊनच खरेदी करावे लागणार आहे. यावेळी नायब तहसीलदार रामदासी याच्यासह तालुक्यातील रेशन दुकानदार बैठकीस उपस्थित होते.