बीड - जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुरेश धस आणि आमदार भीमराव धोंडे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. दुष्काळात जनावरांसाठी सुरू झालेल्या चारा छावण्यांमध्ये धस यांचे कार्यकर्ते सर्वाधिक आहेत. आता भाजपचे आमदार भीमराव धोंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर चारा छावण्यांच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची गुरुवारी भेट घेतली.
आचारसंहिता लागण्यापूर्वी आमदार भीमराव धोंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना चारा छावणी देण्याबाबत डावलल्यामुळे धोंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच चारा छावण्यांवरून होणारे राजकारण सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आणि भाजपचा लोकसभा उमेदवाराला परवडणारे नाही. याबाबत मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषण तीव्रता आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ३३७ चारा छावण्यांना मंजुरी मिळून त्या प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. आष्टी तालुक्यात एकूण १७२ च्या जवळपास गावांची संख्या आहे. सर्वच गावांमध्ये पशुधन आहे. अशा परिस्थितीत आतापर्यंत केवळ ७२ गावांमध्ये चारा छावण्या सुरू झाल्याची माहिती भीमराव धोंडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
सध्या आष्टी तालुक्यात प्रचंड दुष्काळ असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत उर्वरित १०० गावांमध्ये अद्यापही छावण्या सुरू झाल्या नाहीत. त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी छावण्या देऊन पशु मालकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे मत धोंडे यांनी यावेळी व्यक्त केले.
आष्टी तालुक्यात सत्ताधारी भाजप पक्षाचे २ आमदार आहेत, असे असताना देखील बहुतांश गावे चारा छावणीपासून वंचित असल्याचे चित्र आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत देण्यात आलेल्या चारा छावण्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांचा सर्वाधिक समावेश आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी धोंडे यांच्या कार्यकर्त्यांना चारा छावण्या का मिळाल्या नाहीत ? असा प्रश्न धोंडे यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. यावरून पुन्हा एकदा आष्टी विधानसभा मतदारसंघात धोंडे-धस संघर्ष पहायला मिळत आहे.