बीड- ग्रामपंचायत निवडणुकीतील तंटे कमी करण्यासाठी जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी नवा फंडा काढला आहे. आष्टी विधानसभा मतदार संघातील जे गाव बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करेल, त्या गावाला 21 लाख रुपयांचा निधी देण्याचे आमदार आजबे यांनी जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील 129 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अलीकडच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आलेले आहेत. निवडणुकीवरून गावातील दोन गटामध्ये द्वेषाचे वातावरण निर्माण होते. या पुढच्या काळात निवडणुकीमध्ये तंटे होऊ नयेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी बिनविरोध सरपंच निवड करणाऱ्या गावांना निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे , आदर्श ग्राम समितीचे पोपटराव पवार यांनीही स्वागत केले आहे.
हेही वाचा-कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना इतर आजारांनी ग्रासले; निमोनिया, श्वसनाचे विकार, सांधेदुखीचा त्रास
21 लाखांमधील 11 लाखांचा निधी सीएसआर फंडमधून-
बीड जिल्ह्यातही ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. आष्टी मतदारसंघात 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आमदार बाळासाहेब आजबे यांनी आगामी पाच वर्षांच्या काळासाठी प्रत्येकी 21 लाख रुपये विकास निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. यातील 10 लाखांचा निधी आमदार निधीतून तर 11 लाखांचा निधी कंपनी विकास निधीतून ( सीएसआर फंड ) देण्यात येणार असल्याचे आमदार आजबे यांनी सांगितले.