बीड - घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यानंतर परळी वैद्यनाथ येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराची दारे गुरूवारी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उघडण्यात आली. दरम्यान, प्रभू वैद्यनाथाचे दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.
मंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन -
कोरोनाच्या काळात राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. मात्र, राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरुवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच मंदिरात जाऊन मंदिराचे दरवाजे उघडत सर्व प्रथम दर्शन घेतले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दर्शन घेताना सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर निश्चित करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रभू वैद्यनाथाचे दर्शनासाठी भाविकांनी रांगेत उभे राहून तसेच कोविडचे सर्व नियम पाळून दर्शन घेतले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील काळरात्री देवी मंदिर आणि डोंगरतुकाई मंदिरातही जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.