बीड - जिल्ह्यातील नाळवंडी येथील एका विद्यार्थ्यांने वैद्यकीय महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली. गणेश कैलास म्हेत्रे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. गणेश लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या धनंवतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.
महाविद्यालयात होणाऱ्या रॅगिंगबाबत गणेशने आपल्या कुटुंबाला माहिती दिली होती. गणेशच्या वडिलांनी महाविद्यालय प्रशासनाकडे तोंडी तक्रार केली होती. मात्र, यानंतर गणेशला कसलाच त्रास होणार नाही, असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतरही त्रास कमी न झाल्याने गणेश गावी निघून आला आणि विष घेऊन त्याने आपले जीवन संपवले. या बाबतीत महाविद्यालय प्रशासन आणि रॅगिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली.
हेही वाचा - 'जनतेची कामे तातडीने झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा नाहीतर...'
गणेशचे वडील शेतकरी आहेत. आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे यासाठी वडिलांनी कर्ज काढून त्याची फी भरली होती. गणेश देखील जिद्दीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून शिक्षण घेत होता. मात्र, महाविद्यालयातील काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. एकिकडे वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द् आणि दुसरीकडे होणारा मानसिक त्रास यामुळे नैराश्य येऊन गणेशने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती गणेशचे चुलते राधाकिसन म्हेत्रे दिली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.