आष्टी (बीड) - संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी सध्या पोलिस कारवाई करीत आहेत. माञ, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची कोणतीच खाञी न करता त्यांनाही मारहाण करणे. अडवून दंड करण्याचा प्रकार बुधवारी जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे. तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे यांना बीड येथील चऱ्हाटा फाट्यावर पोलिसांनी बेदम मारल्याच्या निषेधार्थ आष्टी तालुका आरोग्य संघटनेच्यावतीने आज (दि. 6 रोजी) कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील लसीकरणही खोळंबले आहे.
याबाबत तालुक्यातील आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बुधवारी सांयकाळी आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विशाल वनवे हे आपले कर्तव्य बजावून आपल्या गावाकडे सांयकाळी निघाले होते. त्यांना चऱ्हाटा येथे पोलिसांनी अडविले व कुठून आला, कुठे चालला असे आर्वच्यभाषेत विचारले. सदरील डाॅक्टरांनी आपल्याकडील असलेले ओळखपञ दाखविले व मी आत्ताच डियुटी करून आलो आहे. आता घरी चाललो आहे. असे सांगत असतानाच एका पोलिस कर्मचाऱ्याने कसलाच विचार न करता पाठीमागून काठी मारली. व तीन चार पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.
याबाबत डाॅ. विशाल वनवे यांनी तक्रार केली असून, आष्टी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी या मारहाणीचा निषेध केला असून, जोपर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही. तो पर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर डाॅ. प्रसाद वाघ, डाॅ. दत्ता जोगदंड, डाॅ. दिपक शेळके, डाॅ. सचिन पाळवदे, डाॅ. नितीन राऊत, डाॅ. नारायण वायभसे या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, आज दिवसभर तालुक्यात कोठेच लसीकरणही होणार नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.