बीड MLA Laxman Pawar Resign : राज्यात सध्या मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Protest) पेटलंय. मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देत बीड जिल्ह्यातील भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी राजीनामा दिलाय. रविवारी सकाळी मराठा आंदोलकांनी माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी व बंगला जाळत निषेध व्यक्त केला. त्यामुळं बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा : गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून या मराठा आरक्षणासाठी माझा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
लक्ष्मण पवार यांचा राजीनामा : मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या राजीनाम्यांचे सत्र सुरू झाले आहे. अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रविवारी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आमदार लक्ष्मण पवार यांनीही राजीनामा दिला आहे.
मराठवाड्यात मराठा आंदोलक आक्रमक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवली येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. सोमवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून, त्यांची तब्येत खालावत आहे. मराठा आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे यांनी दोन दिवस पाण्याचा एक घोट घेतला होता. आता यापुढं अन्न, पाणी आणि उपचाराशिवाय उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय.
आमदारांच्या राजीनाम्याची मागणी : मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. मराठा समाज आक्रमक होत, राज्यकर्त्यांना गावबंदी केली आहे. आम्ही तुमच्या दारात येत नाही. त्यामुळं तुम्ही देखील आमच्या दारात येऊ नका, असं म्हणत मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. तसेच मराठा आरक्षणासाठी लढा नाहीतर राजीनामा द्या, अशी मागणी मराठा आंदोलकांनी लोकप्रतिनिधींकडं केली आहे. त्यामुळं आता भाजपाच्या आमदारानं आपला राजीनामा दिलाय.
हेही वाचा -
- Maratha Protest : बीडमध्ये मराठा आंदोलनात राडा! आमदार संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवलं
- Maratha Protest : आमदार प्रकाश सोळंकेंचं घर जाळल्यानंतर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, एकेरी उल्लेख करत म्हणाले...
- Maratha Protest : 'मराठे कोणाच्या वाट्याला जात नाही, पण तुम्ही आमच्या वाट्याला गेला तर...', जरांगे पाटलांचा सरकारला इशारा