बीड : माणसातली माणुसकी हरवत चालली असल्याचा प्रत्यय जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे गुरुवारी आला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोघांचा अंत्यविधी अंबाजोगाई शहरातील बुरुड तलाव स्मशानभूमी येथे करण्याचे प्रशासनाने नियोजन केले होते. मात्र, तेथील काही नागरिकांनी येथील स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करू नका असे सांगत विरोध दर्शविला आहे.
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शहरातील एका नव्वद वर्ष वयाच्या वृद्धाचा व सिरसाळा येथील 60 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. एकाचा बुधवारी रात्री दहा वाजता तर दुसऱ्याचा गुरुवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र, या दोघांचे मृतदेह अंतिम संस्काराशिवाय स्वारातिच्या शवगृहात पडून आहेत. प्रशासनाने या दोन्हींचा अंत्यसंस्कार बुरुड तलाव स्मशानभूमीत करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करू नका अशी आक्रमक भूमिका येथील नागरिकांनी घेतली.
त्यानंतर स्वाराती रुग्णालयाच्या हद्दीत असलेल्या कॅम्पसमध्ये अंत्यविधी करण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. येथील नागरिकांनीदेखील केवळ विरोधच केला नाही तर दगडफेक करण्याचे नियोजनही केले. या दोन्ही ठिकाणी पोलिसांच्या फौजफाट्यासह नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला गेला. पण, प्रशासनाचा हा प्रयत्न माणुसकी हरवलेल्यांपुढे निष्फळ ठरला. तीस तासापेक्षा जास्त कालावधी उलटूनदेखील या दोन्ही मृतदेहांची विटंबना विद्येच्या माहेरघरात सुरुच राहिली. दोन्ही मृतदेह संस्काराच्या प्रतीक्षेत शवगृहात गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत चिरनिद्रेत होते. दरम्यान, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय प्रशासनाने मृत्यू झालेल्या त्या दोन्ही पॉझिटिव्ह व्यक्तींचे मृतदेह शवगृहात ठेवले आहे. जेव्हा नगरपालिका कर्मचारी घेऊन जायला येतील, तेव्हा आम्ही त्यांच्या ताब्यात ते मृतदेह अंत्यविधीसाठी देऊ असे रुग्णालय प्रशासनाने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.