बीड - केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा ऐनवेळी भाजपमध्ये आल्याने जुने भाजपचे कार्यकर्ते नाराज होते. या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची मोठी कसरत मुंदडा यांना करावी लागत आहे. मतदानाला आता चार दिवसाचा अवधी शिल्लक असताना जुन्यांना संतुष्ट करण्यामध्ये मुंदडा कुटुंबीयांची दमछाक होत आहे. नवख्या असलेल्या नमिता मुंदडा यांना संधी दिली तर नमिता यांचे पती अक्षय मुंदडा व सासरे नंदकिशोर मुंदडा कारभार चालवतील, असा प्रचार नमिता मुंदडा यांचे विरोधक करत आहेत.
नमिता मुंदडा यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाल्याने जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत. मतदारसंघातील भाजपाची जुनी फळी विजयाच्या मार्गात अडसर ठरू नये, म्हणून जुन्या कार्यकर्त्यांना संतुष्ट करताना मुंदडांची दमछाक होत आहे. त्यातच मागील 20 वर्षाच्या काळात मने दुखावलेल्या कार्यकर्त्यांचे गट एकत्र येऊन गटबाजी करू लागल्याने नमिता मुंदडा यांच्या समोर मोठे आव्हान आहे. केवळ नामधारी आमदार आम्हाला नको, असे सूर मतदार आळवू लागले आहेत.
भाजपच्या विद्यमान आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांचा पत्ता कट करण्यासाठी पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये ठोंबरे यांच्या उमेदवारीला विरोध करून कोणालाही उमेदवारी द्या; त्यांचे काम करू, अशी भूमिका एका भाजपमधील गटाने घेतली होती.
तसेच भाजपने प्रवेश दिल्याने नमिता मुंदडा यांचा विजय झाल्याचे स्वप्न त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे रंगवू लागले आहेत. तर भाजपच्या एका विशिष्ट वर्गाच्या बांधील मतावरच मुंदडा हे अवलंबून आहेत. मागील 20 वर्षांच्या काळात भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अनेक कठीण प्रसंगांना सामोरे गेले आहेत. यामध्ये कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मुंदडा यांच्या भाजप प्रवेशाने असंतोष निर्माण झाला असून, ही खदखद यापूर्वी देखील व्यक्त झालेली आहे. भाजपच्या जुन्या उपद्रवी कार्यकर्त्यांची जोखीम कमी करण्यासाठी अवलंबलेली निती आता निवडणुकीत अंगलटी न येण्यासाठी मुंदडा हे या उपद्रवी कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी धडपडत आहेत.
आता नवख्याच्या हातात कारभार नको
2014 च्या विधानसभा निवडणुकीत संगिता ठोंबरे यांना केज मतदारसंघातील जनतेने निवडून दिले होते. त्यावेळी संगिता ठोंबरे यांच्या पतीने त्यांचा कारभाराची सुत्रे हाती घेतली. आता यापुढे भाजपच्या नमिता मुंदडा यांना निवडून दिल्यास नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा व पती अक्षय मुंदडा हेच हाकतील, असा प्रचार नमिता मुंदडा यांच्या विरोधकांकडून केला जात आहे.