बीड- जिल्ह्याच्या राजकारणात प्राबल्य असलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलात बीडला लाल दिवा मिळण्याची शक्यतेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 8 जून रोजी मंत्री मंडळ विस्तार होणार आहे. यामध्ये नव्याने शिवसेना-भाजपमध्ये आलेल्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते. त्याचे कारणही तसेच आहे. विधानसभा निवडणुका चार महिन्यावर आहेत. यादरम्यान भाजप व शिवसेना आपले बस्तान अधिक घट्ट करण्याच्या उद्देशाने राजकीय रणनीती आखत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मंत्रीपदावरून मोठी चर्चा रंगू लागली आहे.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने प्रभाव कायम ठेवू शकलेले माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या मंत्रीपद बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. मागील दोन वर्षापासून आमदार क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. मागील काही निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जयदत्त क्षीरसागर यांनी कायम विरोध केलेला आहे. याशिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात आणि क्षीरसागर या दोघांमधील राजकीय विरोध सर्वश्रुत आहे. क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम करून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली. यासारख्या अनेक राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या निर्णयावर जयदत्त क्षीरसागर नाराज होते. यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांचा जाहीर प्रचार केला. जयदत्त क्षीरसागर यांनी अद्यापपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोडली असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले नसले तरी त्यांच्या मागील दोन वर्षातील कृतीवरून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबत नाहीत, असा अंदाज राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहेत.
राष्ट्रवादीमधील आमदार क्षीरसागर यांची बीड विधानसभा मतदारसंघातील जागा त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी घेतली आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या बाबतीत एवढे सगळे नाराजीनाट्य झाल्यानंतर आमदार क्षीरसागर हे शिवबंधन बांधून घेण्याच्या मानसिकतेत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 8 जून रोजी होत असलेला मंत्रिमंडळ बदलांमध्ये फेरबदलांमध्ये बीड आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने बीडला लाल दिवा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, क्षीरसागर यांच्या बरोबरच काँग्रेसवर नाराज असलेले नगरचे राधाकृष्ण विखे पाटील तसेच रणजितसिंह मोहिते पाटील यांचादेखील मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. 23 मे रोजी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.मात्र, मंत्रिमंडळाच्या या विस्तारात क्षीरसागरांना मंत्रिमंडळात संधी मिळेल का? हे येणारा काळच सांगेल.