बीड - जिल्ह्यातील गेवराई येथे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार बदामराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या मंडप उभारणीचे काम मागील आठ दिवसांपासून सुरू आहे. मात्र ठाकरे गेवराईत येण्याच्या काही तास आधीच, जनआशीर्वाद यात्रेचा सभामंडप कोसळल्याने अपशकुन झाल्याची चर्चा परिसरात होत आहे.
गेवाराईत आयोजीत जनआशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने गेवराई मध्ये हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. आता रविवारी शिवसेनाही शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा गेवराईत आयोजित करत आहे. मात्र गेवराईत सभामंडप कोसळल्याने, अपशकुन झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई येथील माजी आमदार बदामराव पंडित यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत जन आशीर्वाद यात्रा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मोठा सभामंडप उभा केला होता. सगळी तयारी पूर्ण झाली होती. मात्र अधिक गतीने हवा सुटल्यामुळे आठ दिवसापासून उभारणीचे काम सुरू असलेला सभामंडप ऐनवेळी म्हणजे रविवारी सकाळी कोसळला. आदित्य ठाकरे यांची रविवारी दुपारी तीन वाजता सभा होणार आहे. कोसळलेला सभामंडप पुन्हा सुस्थितीत उभारण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून या घटनेचे विश्लेषण करताना म्हटले आहे की, 'सभामंडप पडला आता निवडणुकीतही पडणार'.
गोवराईत मात्र सभामंडप पुन्हा उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून कार्यक्रम स्थळी स्वतः माजी राज्य मंत्री बदामराव पंडित व त्यांचे चिरंजीव युद्धजित पंडित तळ ठोकून उभे आहेत.