परळी - गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथी निमित्ताने त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाचा गौरव म्हणून गुरूवारी केंद्र सरकारच्या डाक विभागाकडून पोस्ट पाकिटाचे विमोचन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले. तर गोपीनाथ गडावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डाॅ. प्रितम मुंडे, खासदार डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत एकाच वेळी करण्यात आले.
भाजपाच्या नेत्यांची ऑनलाईन उपस्थिती -
गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आज गोपीनाथ गडावर कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय डाक विभागाच्यावतीने त्यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या पोस्टल पाकिटाचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बानवकुळे यांनी हिंगोलीहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील पुण्याहून सहभागी झाले होते. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे व खासदार डॉ. भागवत कराड यांनी गोपीनाथ गडावर उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला. तर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरहून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. तसेच मुंबई प्रदेश कार्यालयातून केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विनोद तावडे आदी सहभागी झाले होते.
'गोपीनाथ मुंडेंचे जाणे आमच्यासाठी वेदनादायी' -
यावेळी बोलताना मोठे भाऊ मुंडे यांच्या कार्याचा गौरव करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. त्यांचे अचानक जाणे आमच्यासाठी वेदनादायी होते. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी धडपडणारा नेता आज आमच्यात नाही. ते आज असते, तर देशातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक संकल्पना त्यांनी मांडल्या असत्या. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजाताई गोरगरीबांसाठी काम करत आहेत. प्रितमताई देखील संसदेत चांगले काम करत त्यांची उणीव भरून काढत आहेत, अशी प्रतिक्रिया रविशंकर प्रसाद यांनी दिली.
'गोपीनाथ मुंडे इन्व्हलपच्या माध्यमातून घरा घरात जातील' -
गोपीनाथ मुंडेंचे जीवन संघर्षमय होते. भाजपच्या स्थापनेपासून त्यांनी काम केले. सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. आतापर्यंत ते लोकांच्या मना मनात होते. आता इन्व्हलपच्या माध्यमातून घरा घरात जातील. भारतीय डाक विभागाने त्यांचा जो गौरव केला आहे, त्याबद्दल पंतप्रधान मोदीजी, नड्डाजी व केंद्र सरकारचे मी आभार मानते. ३ जून ते त्यांचा जन्मदिवस १२ डिसेंबर या दरम्यान प्रत्येकाने हे पाकिट घेऊन त्यात मोदीजींना आपली मन की बात सांगावी, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
हेही वाचा - शिक्षकांसाठी खुशखबरः आता आयुष्यभर राहिल TET सर्टिफिकेटची वैधता