बीड- कोरोनाने बीड जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढायले आहे. मागील आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नऊ जणांचा बळी गेला आहे. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी असताना देखील बीड जिल्ह्याचा मृत्यूदर तीन ते सव्वा तीन टक्के एवढा आहे. बीड जिल्ह्यातील वाढता मृत्यूदर आता चिंतेचा विषय बनू लागला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देऊन उत्तम आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक आहे. अन्यथा मृत्यू दर रोखणे कठीण होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
आरोग्य विभाग असफल-
बीड जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढू लागले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याची परिस्थिती असली तरी देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बळीची संख्या झपाट्याने वाढत आहे. 94 टक्के रुग्णांना तीव्र स्वरूपाचे लक्षणे नाहीत. ही वस्तुस्थिती असतानाही जे रुग्ण अतिगंभीर आहेत. त्यांना उत्तम आरोग्य सेवा देऊन वाचवण्यामध्ये जिल्हा आरोग्य विभाग असफल ठरत आहे. 1 ते 7 मार्च या आठवड्यात जिल्ह्यात 573 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यामध्ये 9 कोरोना बळी गेले असल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण 94 टक्के आहे. 5 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. आणि केवळ 1 टक्के रुग्ण क्रिटिकल असल्याचे आरोग्य विभागाची माहिती सांगते. असे असताना देखील केवळ 1 टक्के कोरोना रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यामध्ये आरोग्य विभाग असफल ठरत आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचे मोठे आवाहन-
एकंदरीतच या सगळ्या आकडेवारीवरून गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असतानाही मृत्यूवर नियंत्रण का मिळत नाही. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडे असलेली यंत्रणा अजून सक्षम करून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचे मोठे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
हेही वाचा- शरजील उस्मानीला पुणे पोलिसांसमोर हजर राहावे लागणार!