मुंबई - कोरोना संक्रमण काळात बेकायदेशीर रित्या मेडिकल ऑक्सिजन सिलिंडर व किट विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 9ने गुप्त माहितीवरुन ही कारवाई केली. फिरोज सलीम सलेह (25) सलीम हबीब सालेह (50) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
6 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त -
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथील मरकस हॉटेलच्या समोर एका गोडाऊनमध्ये बेकायदेशीररीत्या मेडिकल ऑक्सिजन सिलिंडरचा साठा करुन ठेवल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट 9ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला असता त्यांना मेडिकल ऑक्सिजनने भरलेले पांढऱ्या रंगाचे 25 सिलेंडर आणि बारा ऑक्सिजन किट मिळून आले.
हे ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन किट आरोपींनी कुठून आले याबद्दल पोलिसांनी विचारणा केली. यावेळी दोन्ही आरोपींनी हे ऑक्सिजन सिलिंडर व अक्सिजन किट हे मीरा भाईंदर येथे बेकायदेशीररित्या आले असल्याचे कबूल केले. पोलिसांनी जप्त केलेल्या ऑक्सिजन सिलिंडर व ऑक्सिजन किटची किंमत 6 लाख 86 हजार इतकी आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - पीपीई किटमधील घामापासून सुटका; पुण्याच्या निहालचे कोव्ह-टेक व्हेटिलेशन ठरतेय प्रभावी