बीड - कधी अवैध वाळू उपसा तर कधी खदानीतील मुरूम उपसून पर्यावरणाला फाटा देत राजरोस खडी क्रेशर बीड जिल्ह्यात सुरू आहेत. आज घडीला प्रत्यक्षात जिल्ह्यात सुमारे 75 खडी केंद्र सुरू आहेत. मात्र, 60 खडी क्रेशर चालकांनीच रीतसर गौण खनिज विभागाकडून परवानगी घेतलेली आहे. ही वास्तवदर्शी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. याचा पर्यावरणाला मोठा फटका बसत आहेच, मात्र खडी क्रेशरमुळे निर्माण होणाऱ्या धुळीचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
पर्यावरण विभाग तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम पाळून खडी क्रेशर चालवणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याएवढीच आहे. दगड खदान उपसा बेसुमार केला जात आहे. बीड येथील गौणखनिज विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात एकूण परवानगी असलेले 60 खडी क्रेशर आहेत.
तक्रार करूनही कारवाई नाही - मनोज बेदरे
नाळवंडी नाका ते चिंचोली माळी या तीन किलोमीटर रस्त्याच्या बाजूला शासनाने खडी क्रेशर चालवायला परवानगी दिलीच कशी? अनेक वेळा या खडी क्रेशरचा आम्हाला त्रास होतोय, याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तक्रार करून देखील आम्हाला दोन वर्षांपासून न्याय मिळत नसल्याचे बीड तालुक्यातील चिंचोली माळी येथील सरपंच मनोज बेंद्रे यांनी सांगितले. अक्षरश: चिंचोली माळी येथून बीडकडे येताना तीन किलोमीटरच्या अंतरात धुळीचे लोट सुरू असतात. अवघ्या अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये म्हणजेच बीड ते चिंचोली माळीपर्यंत 12 ते 15 खडी क्रेशर रस्त्याच्या बाजूला सुरू आहेत. एवढेच नाही तर रस्त्यालगतच मोठमोठ्या खदानी देखील खोदलेल्या आहेत. या सगळ्या बाबींकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सरपंच मनोज बेंद्रे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, खडी क्रेशरच्या धुळीमुळे आमच्या गावात 40 ते 50 टक्के नागरिकांना फुफ्फुसाचे आजार झाले आहेत. तरीदेखील प्रशासन पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अवैध खडी क्रेशर चालकांवर कुठलीच कारवाई करत नसल्याचेही ते म्हणाले.
पिकांना देखील बसतोय फटका
खडी क्रेशरमधून उडालेल्या धुळीचे प्रमाण नाळवंडी नाका ते चिंचोली माळी दरम्यान पिकांवर देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पाहायला मिळाले. झाडांची पाने तसेच पिकांवर मोठ्या प्रमाणात धुळीचे थर साचलेले असतात. या अवैध व पर्यावरणाचे नियम न पाळणार्या खडी क्रेशरच्या प्रदूषणामुळे आजूबाजूचे शेतकरी हैराण आहेत. मात्र, तक्रार करावी तर कारवाई होत नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दिवसेंदिवस वाढतायत फुफ्फुसाचे आजार - डॉ. सचिन वारे
धुळीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. या बरोबरच नागरिकांच्या आरोग्याला देखील याचा मोठा फटका बसत आहे. मागच्या तीन-चार वर्षांत फुफ्फुसाचे आजार देखील वाढत आहेत. त्यामुळे धुळीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. कारण धुळीचे छोटे-छोटे कण हळूहळू श्वासनलिकेत जमा होतात व पुढे यातून मोठे आजार उद्भवतात, त्यामुळे श्वास घेण्यासदेखील यामुळे त्रास होतो. अलीकडे फुफ्फुसाचे आजार होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढले असल्याचे डॉक्टर सचिन वारे म्हणाले.
याबाबत तहसीलदार श्रीकांत निळे म्हणाले की, आम्ही गत महिन्यांमध्ये अवैध सात खडी क्रेशरवर कारवाई करून सील केले आहेत. तक्रारी येतात त्याप्रमाणे आम्ही नियमानुसार कारवाई करत आहोत. यापुढे देखील तक्रारी आल्या तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असे तहसीलदार निळे म्हणाले.
हेही वाचा - 'कंगनाने राजकीय पक्षाचे चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी'
हेही वाचा - तुम्हाला युपीआयवरील आर्थिक व्यवहार मोफत आहेत की नाहीत? जाणून घ्या, सविस्तर माहिती