बीड - पैठण येथील जायकवाडी प्रकल्प 90% भरला असल्याने प्रकल्पातून बीडच्या माजलगाव प्रकल्पात पाच हजार क्युसेस वेगाने पाणी सोडले जात आहे. या पाण्याचा बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या 63 गावांना फटका बसू शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात गोदाकाठी एकूण 63 गावे आहेत. यामध्ये गेवराई तालुक्यात 32 गावे, माजलगाव तालुक्यात 26 गावे तर परळी तालुक्यात पाच गावे आहेत. जायकवाडी प्रकल्पातून सोडलेले पाणी अद्याप बीड जिल्ह्यात पोहोचले नाही. बीड जिल्ह्यात पाणी येण्यापूर्वी खिरपुरी, शहागड, पाथरवाला बंधारा भरून पुढे पाणी माजलगाव धरणात जाणार आहे. मात्र, 2005 मध्ये अचानक गोदाकाठी वसलेल्या गावांना जायकवाडीच्या पाण्याने वेढा टाकला होता. यामुळे अनेक गावे पाण्याखाली जाऊन संपर्क तुटला होता. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.
गावस्तरावर कमिटी बनवून सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर सर्व ग्रामस्थांकडे देण्यात आले आहेत. याशिवाय, गावात पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांचा ग्रुप बनवला गेला आहे. अचानक पूर परिस्थिती उद्भवली तर त्याचा सामना करता यावा या उद्देशाने बीड जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.
बीड जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी स्थिती आहे. मात्र, जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग केलेले पाणी नदीपात्रात येणार आहे. पुढे माजलगाव प्रकल्पात हे पाणी साठवून राहणार आहे. सद्य स्थितीला माजलगाव बॅकवॉटर मृत्त साठ्यात आहे. या पाण्यामुळे बीड शहराची पाण्याची गरज भागवण्यास मदत होईल.