बीड - येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्या प्रकरणाचा निकाल देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सार्वजनिक ठिकाणी जल्लोष साजरा करणे, मोर्चा काढणे अथवा शस्त्र जवळ बाळगणे याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च मानून सर्वधर्मीय नागरिकांनी शांततेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील पोद्दार यांनी केले आहे.
पुढील आठवडाभरात अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन धर्मांमध्ये निकालावरून दंगल घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवारी बीड येथे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, की नागरिकांनी भयभीत होऊन जाण्याचे कारण नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करेल.
सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत. तसा व्हिडिओ निदर्शनास आल्यास पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावा. जेणेकरून समाजात अथवा दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही व शांतता प्रस्थापित होईल. तसेच पोलीस विभागाला शांतता राखण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा- 'राजकारण बाजूला ठेऊन नुकसानीच्या पंचनाम्यासाठी प्रशासनाला मदत करा'
१९९२ साली जेव्हा बाबरी मस्जिद पाडली होती, तेव्हा ज्या लोकांचा दंगली उसळविण्यात सहभाग होता, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. येत्या आठ-दहा दिवसात अयोध्या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे. यादरम्यान सोशल मीडियावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती देखील पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- सरसकट कर्जमाफी करून तत्काळ पीक विमा द्या; बीडमध्ये शेतकरी संघटना आक्रमक