बीड - जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत एकूण 87.50 टक्के एवढ्या पावसाची नोंद बीड जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यातील वडवणी, केज, धारूर व अंबाजोगाई तालुक्यात दमदार पाऊस झाला असून जिल्ह्यातील छोटे ओढे व नद्यांना पूर आला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सुरुवात समाधानकारक झाली असल्याने शेतकरी सुखावला आहे.
जिल्ह्यातील पुसरा गावातील नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे तिगाव, चिंचाळा, दुकडेगाव आदी गावाचा काही काळ वडवणीपासून संपर्क तुटला होता, तर दुसरीकडे केज तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाच्या दमदार आगमनामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच बीड-अंबाजोगाई रोडवर नांदूरफाटा, मस्साजोग आणि कोरेगाव येथील नद्यांना पाणी आल्यामुळे पुलाचे काम सुरू आहे. तसेच वळण रस्त्यावरून पाणी वाहत आहे. होळ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 87.50 टक्के एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पर्जन्यमान -
तालुका | पर्जन्यमान |
बीड | 57.5 मिमी |
पाटोदा | 84.5 मिमी |
आष्टी | 80.4 मिमी |
गेवराई | 46.0 मिमी |
शिरूर | 49.7 मिमी |
वडवणी | 120 मिमी |
अंबाजोगाई | 101.2 मिमी |
माजलगाव | 118.7 मिमी |
केज | 84.4 मिमी |
धारूर | 83.7 मिमी |
परळी | 70.2 मिमी |