बीड - पंकजा मुंडेंनी ओबीसीच्या अडचणी दूर केल्या असत्या तर ओबीसी नेतृत्व म्हणून आम्ही त्यांना मान्य केले असते. पंकजा या गोपीनाथ मुंडे यांच्या संपत्तीचे वारसदार आहेत. मात्र, पंकजा मुंडे यांचे नेतृत्व महाराष्ट्रातील ओबीसी समाज स्वीकारत नाही, असे वक्तव्य आमदार हरिभाऊ राठोड यांनी केले.
राज्यभरातील बंजारा समाजाचा विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी आमदार हरिभाऊ राठोड बीडला आले होते. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंकजा मुंडे या केवळ मुंडे साहेबांच्या संपत्तीच्या वारसदार आहेत. खरे मुंडे साहेबांचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत. ओबीसी समाजासाठी मुंडे साहेबांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी केली होती. मात्र, भाजप सरकारच्या काळात या मागणीला बगल देण्यात आली, असा आरोपही आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला.
वडवणी तालुक्यातील स्वाती राठोड या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेला आरोपींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी बंजारा समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली. या मोर्चात राज्यभरातील बंजारा समाजाचे नागरिक सहभागी झाले होते.