बीड - 5 जुलै हा दिवस सर्वत्र गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुविषयी आपली भावना व्यक्त करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले जाते. या अनुषंगाने 'ईटीव्ही भारत'ने 'तस्मै श्री गुरुवे नम:' या मालिकेच्या माध्यमातून राज्यातील विविध सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी या सर्वांनी आपापल्या गुरुविषयी आपली भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या शिकवणी आणि आठवणींना उजाळा दिला.
बीड पोलीस अधीक्षक - हर्ष पोद्दार
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरूच्या संदर्भाने दोन टप्पे पडतात. पहिला टप्पा हा प्रत्येक व्यक्तीचे आई-वडील त्या व्यक्तीवर संस्कार करत असतात. आपल्या आयुष्यातील वाटचाल आई-वडील यांच्या संस्कारातूनच ठरतात. त्यामुळे माझे पहिले गुरू माझ्या आई-वडील आहेत.
यानंतर माझ्या आयुष्यात गुरु संदर्भातला दुसरा टप्पा म्हणजे, ज्या मातीत राहून मला शिकायला मिळाले ती माती माझ्यासाठी अत्यंत वंदनीय आहे. ती मातीच माझी गुरु आहे. इतकेच नाही तर या महाराष्ट्राच्या मातीने मला खूप काही शिकवले आहे. त्यामुळे ही माती माझी गुरु आहे, या शब्दात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आपल्या गुरूविषयी भावना व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले, प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना जे आवडते ते काम करण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून मुलांना आपल्या कामामध्ये आवड आणि रूची निर्माण होईल. मी माझे काम करत असताना ज्या मातीतील लोकांसाठी काम करतो ती जनता आणि तिथली माती माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून मी धरणी मातेला माझे गुरु मानतो, असेही पोद्दार म्हणाले.