बीड - बीड शहरातील चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये नववी व दहावीचा वर्ग मिळून 175 विद्यार्थी आहेत. यापैकी केवळ तीनच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत मुलं पाठविण्याबाबत संमतीपत्र दिले आहे. तीन मुलांवर शाळा सुरू करायची कशी? असा प्रश्न चंपावती इंग्लिश स्कूलचे प्राचार्य ए. आर. गंधे यांनी उपस्थित केला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल अद्याप शाळेला मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि शाळांमध्ये समन्वय नसल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत पालक फारसे उत्सुक नसल्याचे समोर येत आहे. याबाबत काही पालकांशी संवाद साधला असता पालकांनी म्हटले आहे की, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आम्ही आमची मुले शाळेत कशी पाठवायची? अद्यापही आमच्या मनात मुले शाळेत पाठवण्याबाबत असुरक्षिततेची भावना आहे. ज्याप्रमाणे शिक्षकांची कोरोना चाचणी झाली, त्याचप्रमाणे मुलांची देखील कोरोना चाचणी करण्यात यावी अशी मागणी पालक करत आहेत. राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिल्यानंतर शाळा प्रशासनाने मात्र पूर्ण तयारी केली आहे. सर्व वर्गांची स्वच्छता करण्यात आली आहे. परंतु मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांचे संमतीपत्र मिळत नसल्यामुळे, शाळा सुरू होणार की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.