बीड - कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये गोंधळी समाजातील कलाकारांना सांस्कृतिक कार्यक्रम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. घरातील महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र मोडून उदरनिर्वाह करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याची कैफियत बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील गोंधळी समाजातील कलावंत तथा शाहीर गोंधळ परिषदेचे अध्यक्ष कैलास काटे यांनी मांडली.
बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात मोठ्या प्रमाणात गोंधळी समाज आहे. लग्न समारंभामध्ये जागरण गोंधळचा कार्यक्रम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, कोरोनाच्या बिकट परिस्थितीनंतर या समाजाला कार्यक्रम मिळणे बंद झाले आहे. परिणामी घरातील महिलेच्या अंगावरील मंगळसूत्र मोडून उदरनिर्वाह कसाबसा करावा लागत असल्याचे कुटुंबीय सांगतात.
अशी आहे परस्थिती
लिंबागणेश मधील जागरण गोंधळ पार्टीमधील विलास विठ्ठल काटे यांच्या कुटुंबात पाच माणसे आहेत. या कुटुंबात त्यांची एक दिव्यांग बहीण असून तिचा वैद्यकीय खर्च आणि कुटुंबाची जबाबदारी एकट्या विलास यांच्यावर आहे. विलास हे उत्तम संबळ वादक असून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देखील मिळालेला आहे. मात्र, टाळेबंदी सुरू झाल्यापासून जागरण गोंधळ व सांस्कृतीक कार्यक्रम बंद असल्याने कुटुंब चालवायचा कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. त्यामुळे विलास यांनी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून चार महिने घर चालवलं. यांच्यासारखे बीड जिल्ह्यात सुमारे 200 कुटुंब आहेत. त्यांच्यावरही अशीच वेळ आली आहे. गोंधळी मंडळींना या व्यतिरीक्त कोळतेच काम येत नसल्याने सरकारने कलाकारांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा - 'शाळा सुरू असती तर, माझा मुलगा वाचला असता'; निलेशच्या आई-वडिलांनी फोडला टाहो