बीड - मुंबई येथे पोलीस दलात नोकरीला असलेल्या पत्नीचा बीड जिल्ह्यातील शिरूर घाट ते मुंबई पर्यंतचा अत्यावश्यक सेवेचा पास काढला होता. त्या पासवर पत्नीला मुंबईला सोडलेही. मात्र, परत येताना मुंबईहून बहिणीला घेऊन आल्याच्या प्रकरणावरून संबंधित व्यक्तीवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामधील शिरूरघाट येथे शांतीनाथ शाहू सांगळे यांच्या घरी कोणीतरी मुंबईहून आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावरुन त्यांनी शिरूरघाट येथे सांगळे यांचे घर गाठले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, आमच्या येथे कोणीही मुंबईहून आलेले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावर पोलीसांना एक महिला मुंबईहून आल्याचे तिच्या हावभावावरून लक्षात आले. तिच्याकडे त्यांनी चौकशी केली असता, तिने मी व माझा भाऊ मुंबईहून आलो आहोत, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आरोग्य तपासणी करून घ्या, अशा सूचना केल्या. मात्र सांगळे कुटुंबीय त्यास विरोध करत तिला कोरोना झाला नाही, असे उत्तर दिले.
ग्रामसुरक्षा दलाचे कार्येकर्तेही त्यांना आरोग्य तपासणी करायला जा म्हणून सांगायला गेले होते. त्यांनाही सहकार्य केले नाही व आपली माहिती लपवून ठेवली. त्यामुळे पो.नि.अतिष रेणदेव मोराळे यांनी केज ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोनिया कारभारी गुट्टे (रा.वसई, मुंबई), तिचे नातेवाईक शांतीनाथ शाहू सांगळे, वैजेनाथ रावसाहेब सांगळे, प्रशांत बाबासाहेब सांगळे, अशोक शांतीनाथ सांगळे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात कलम 188, 269, 270 भादंविसह कलम 51 (ब), आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 सह कलम 17 महाराष्ट्र पोलीस अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे.