बीड - शिवसेनेत राजकीय बंडखोरी झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला वर्षा हा सरकारी बंगला सोडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री राजिनामा देणार का अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात मोठी उलथापालथ सुरू आहे. त्यातच बीडच्या एका शेतकऱ्याने चक्क राज्यात बंडाळी सुरू असल्याने मला मुख्यमंत्री करा असे पत्रच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. श्रीकांत विष्णू गदळे असे त्या राज्यपालांना पत्र लिहिणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
महाराष्ट्राच्या जनतेचे प्रचंड नुकसान - महाराष्ट्रात सध्या स्थिर सरकार नसल्याने महाराष्ट्राच्या जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी देखील स्वतःचे राज्य सोडून जनतेची काळजी न करता खुर्ची व पदासाठी परराज्यात जाऊन बसले. तसेच राज्याचे राज्यपाल यांना देखील दुर्दैवानं कोरोना झाल्यामुळे त्यांचा पदभार परराज्यातील राज्यपालांना सोपवावा लागला. यामुळे महाराष्ट्राची जनता अगदी पोरकी झाली आहे. महाराष्ट्रातील अशा अघोरी राजकारणामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहू लागले व जनता अगदी हतबल झाली आहे. म्हणून जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकारण स्थिर होऊन मुख्यमंत्रिपद स्थिर होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा प्रभारी पदभार जनतेच्या हिताचा विचार करून माझ्याकडे सोपवावा अशा प्रकारचे पत्र गदळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे.