बीड - जिल्ह्यातील पाटोदा शहराजवळील हनुमान वस्तीतील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्येतून नाईलाजाने शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. संतोष राजाराम तांबे (वय 36) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा- खासगीकरणाची प्रक्रिया अयशस्वी ठरली तर एअर इंडिया बंद होणार
संतोष यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांना एक एकर शेती आहे. उसनवारी, कर्ज काढून त्यांनी पेरणी केली. शेतीच्या मशागतीसाठी देखील मोठा खर्च केला. सुरुवातीला कोरड्या तर नंतर ओल्या दुष्काळने नापिकी झाली. त्यामुळे त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते.
कुटुंब जगवणे, तसेच त्यांना पाठीचा असललेला त्रास, यामुळे ते त्रस्त होते. या विवंचनेत त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. संतोष यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी आई, दोन भाऊ असा परिवार आहे. तर त्यांच्याकडे बुलढाणा अर्बन बँकेचे तसेच खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. यात स्व.खर्चाने वस्तीवर केलेल्या रस्त्याचे बील निघाले नाही, असा देखील उल्लेख आहे.