बीड - पोखरा योजनेंतर्गत घेतलेल्या शेततळ्याच्या अस्तरीकरणचे अनुदान मागील आठ महिन्यापासून मिळाले नसल्याने, शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी बीड जिल्ह्यातल्या राक्षसभुवनमध्ये घडली आहे. बाळासाहेब ज्ञानोबा मस्के (वय-42) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
बाळासाहेब मस्के यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'मायबाप सरकार मी आत्महत्या करत आहे. शासकीय योजनेतील पैसे मिळाले नसल्याने कर्जबाजारी झालो आहे. तसेच प्रिय बंधू नाना व आप्पा माझी दोन मुलं आहेत, त्यांना तुमच्या मुलाप्रमाणे सांभाळा, मी जात आहे मला माफ करा.' असे त्यांनी आपल्या भावाला उद्देशून म्हटले आहे. मस्के यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यपालन व्यावसाय सुरू केला होता, मात्र त्याचे देखील त्यांना अनुदान मिळाले नव्हते. त्यामुळे उसने घेतलेले पैसे फेडायचे कसे या विवंचनेत ते होते, अखेर शुक्रवारी त्यांनी आत्महत्या केली.
शेतकऱ्याच्या आत्महत्येने जिल्ह्यात हळहळ
या घटनेने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शासकीय योजनांचा लाभ फक्त धनदांडग्यांनाच मिळतो का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. शेतकऱ्याच्या योजनेचे पैसे वेळेत न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.