बीड - गेल्या तीस वर्षांमध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, हे खरे आहे. मात्र, अंमलबजावणीवरच नव्या शैक्षणिक धोरणाचे यश अवलंबून आहे. एकंदरीत जे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे, त्याची यशस्विता अंमलबजावणीवर अवलंबून आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार कोणत्याही विषयाची निवड करण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे. त्यामुळेच सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण कौशल्य आणि ज्ञानाधिष्ठित मनुष्यबळ निर्माण करण्यास मदत करेल, असे शिक्षण तज्ञ तथा प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - मास्क, सॅनिटायझर दर निश्चितीसाठी समिती स्थापन, 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश
मागील तीस वर्षात पहिल्यांदाच केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले. परंतु, या नव्या शैक्षणिक धोरणात येणाऱ्या नव्या पिढीला काय लाभ होणार आहे, याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ञांकडून मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत बीड येथील प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात बोलताना सांगितले की, पाश्चिमात्य देशात अशा प्रकारचे शिक्षण मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. आता भारतात देखील सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचे जाहीर केले. याचा लाभ येणाऱ्या नव्या पिढीला होईल, अशी अपेक्षा आहे.'
यासोबतच, 'एखादा विद्यार्थी कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेत असेल आणि त्याला विज्ञान शाखेतील एखाद्या विषयाची आवड असेल, तर त्याला तो विषय अभ्यासण्याचे स्वातंत्र्य नव्या शैक्षणिक धोरणात आहे. याचा फायदा सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी होईल. केंद्र सरकारने ज्या गाईडलाईन दिल्या आहेत, त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरण चांगले असले तरीही नव्या शैक्षणिक धोरणाची यशस्विता योग्य अंमलबजावणीवरच असेल' असे डॉ. सविता शेटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.