बीड - महाराष्ट्रासह 6 राज्यातील 'ऑइल इंडस्ट्रीज'मध्ये ठसा उमटवणाऱ्या व ४० कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या बीडच्या या महिला उद्योजिकेने स्वकर्तुत्वावर स्वतःला सिद्ध केले आहे. तिरूमला ऑइल कंपनीच्या 'मॅनेजिंग डायरेक्टर' अर्चना सुरेश कुटे असे या कर्तृत्ववान महिलेचे नाव आहे. यशस्वी महिला उद्योजक म्हणून श्रीलंकेत 'ग्लोबल एशिया वुमन' या पुरस्काराने अर्चना कुटे यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या कर्तुत्वान महिलेच्या कार्याचा 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा आढावा.
साधारणत: चार-पाच वर्षांपूर्वी अर्चना कुठे यांनी 'तिरूमला ऑइल कंपनी'चा पदभार स्वीकारली. बीड जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागात 'ऑइल इंडस्ट्रीज' सुरू करून यशस्वी देखील करून दाखवली. कुटे ग्रुपच्या प्रमुख म्हणून काम करत असताना बँकिंग क्षेत्रापासून ते डेअरी उद्योग सेंटर, 'ऑइल इंडस्ट्रीज' अशा वेगवेगळ्या व्यवसायात अर्चना कुटे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आज घडीला महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तिरूमला ऑईल जात असल्याचे त्या मोठ्या अभिमानाने सांगतात. घर संसार संभाळून कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टरचे काम समर्थपणे त्या करत आहेत. एवढेच नाही तर तिरूमला 'हेअर ऑइल'च्या अॅम्बेसिडर स्टार अभिनेत्री माधूरी दीक्षित या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कंपनीत नोकरीसाठी महिलांना प्राधान्य -
बीड सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातील महिला व मुलींना तिरूमला कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्यावर अर्चना कुठे यांचा भर आहे. आजघडीला त्यांच्या चाळीस कंपन्यांमध्ये 70 टक्के ग्रामीण भागातील मुली काम करत आहेत.
हेही वाचा - परीक्षा केंद्रावर एअरगनसह तरुण ताब्यात; बीडमधील प्रकार
40 कंपन्यांचे नेतृत्व करत असताना अनेक वेळा अडचणी येतात महिला म्हणून येणाऱ्या अडचणी वेगळ्या असतात. मात्र, तुमच्याकडे निर्णय क्षमता असेल तर कोणत्याही समस्येवर कंपनीच्या हिताचा निर्णय घेऊ शकता, असे त्या म्हणाल्या. मागच्या ४-५ वर्षांमध्ये काम करत असताना मला अनेक अडचणी आल्या. एक वेळ तर अशी होती की, आमच्या स्पर्धक कंपन्यांकडून मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र, मी सक्षमपणे कंपनीच्या हिताचा निर्णय घेतला व तो निर्णय यशस्वी देखील करून दाखवला आहे. या कंपनीत केवळ मी एकटीच काम करते असे नाही. तर ग्रामीण भागातील अत्यंत गरीब कुटुंबातील मुली व महिला माझ्याबरोबर काम करत आहेत. महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी मी विशेष काळजी घेते असे त्या यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा - 'कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हस्तांदोलन करू नका'