बीड - मागील वर्षभरात बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अशा परिस्थितीत मजूर शेतकरी विद्यार्थी यांच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बीड पोलीस मुख्यालय येथे ध्वजारोहण प्रसंगी ते बोलत होते.
लसीकरणात जिल्ह्याचा चौथा क्रमांक
याप्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड जिल्हाधिकारी आर. एस. जगताप, पोलीस अधीक्षक आर. राजा आदींची उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर उपस्थितांची संवाद साधताना पालकमंत्री मुंडे म्हणाले की, सध्या आपल्याकडे लसीकरणाची मोहीम सुरू आहे. लसीकरणामध्ये राज्यात बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यात लसीकरणाचे विस्तारीकरण करून सर्वसामान्य नागरिकांना लस देण्याची मोहीम राबवण्यात येईल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासस्थान त्याचबरोबर त्यांच्या शिक्षणाची विशेष व्यवस्था सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून करण्यावर भर देण्यात येणार आहे.
नागरिकांचा सत्कार
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाईल. याबरोबरच शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण असेल किंवा शेतीसाठी लागणारे साहित्य असेल याची उपलब्धता करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांना शौर्य पदक मिळाल्याबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - मुंबईतील विजेचा ब्रेकडाऊन होता सायबर हल्ला? गृहमंत्री अनिल देशमुखांचे संकेत