अंबाजोगाई (बीड) - केज तालुक्यातील होळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्यास म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराने ग्रासले आहे. उपचारात लाखो रूपये खर्च झाल्यानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकरी रुग्णास पुढील उपचारासाठी पैशांची गरज होती. शेतकऱ्याची ही अडचण ओळखून आधार डायग्नोस्टीक सेंटरचे संचालक डॉ.नितीन पोतदार यांनी त्याच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची मदत केली आहे.
एक लाखांची मदत
होळ येथील अल्पभूधारक शेतकरी चंद्रकांत शिंदे हे म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराशी लढा देत आहेत. आतापर्यंत या गरीब कुटुंबाचा उपचारावर साडेचार लाखांचा खर्च झाला आहे. तरीदेखील उपचारासाठी आणखी जास्त खर्च अपेक्षित आहे. इनमीन दोन एकर जमीन असलेल्या या शेतकऱ्यासमोर पुढचा इलाज कसा करावा याचे संकट उभे राहिले. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते संभाजी लोमटे यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर डॉ. नितीन पोतदार यांनी सामाजिक भावनेतून या रुग्णाच्या उपचारासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. सदर रकमेचा धनादेश चंद्रकांत यांच्या पत्नी उमा शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. एवढेच नव्हे तर भविष्यातही आणखी मदतीची तयारी डॉ. पोतदार यांनी दर्शविली आहे.
ग्रामस्थही धावले मदतीला
दरम्यान, आपल्या गावकऱ्यावर बेतलेली परिस्थिती पाहून होळ ग्रामस्थांनीही आपापल्यापरीने वर्गणी देऊन जवळपास ९० हजारांची मदत चंद्रकांत शिंदे यांना दिली आहे. सर्व भेदभाव विसरून गावकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याच्या ग्रामस्थांच्या भुमिकेचे कौतुक होत आहे.
डाॅक्टर या नात्याने केली मदत
आत्तापर्यंत चंद्रकांत यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत त्यांना चार लाखाच्या जवळपास खर्च केला आहे. समाजमाध्यमातून याबाबत माहिती मिळाल्यानंतर माझे मन हेलावले. होळ या गावाशी माझे भावनिक नाते आहे. सामाजिक भावनेतून एक डाॅक्टर म्हणून मी या कुटूंबाला मदत केली, गरज पडल्यास आणखी करेन, अशी भावना डॉ पोतदार यांनी व्यक्त केली आहे.