बीड - हुंड्यासाठी पत्नीचा छळ करत तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी गोरखनाथ दादासाहेब आगम याला (रा. पिंपरगव्हाण ता. बीड) १० वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी निर्णय देताना सासू रामकवर दादासाहेब आगम आणि सासरा दादासाहेब लक्ष्मण आगम यांनाही सुनेचा छळ केल्या प्रकरणी २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
मृत छाया गोरखनाथ आगम हिला विवाहानंतर काही दिवस सुखाने नांदविण्यात आले. त्यानंतर पती गोरखनाथ, सासरा दादासाहेब व सासू रामकवर या तिघांनी तू तुझ्या वडिलांकडील शेती पती गोरखनाथ याच्या नावावर करुन दे, या कारणावरुन तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला. ३ एप्रिल २०१७ ला रात्री छाया ही घरात असताना पतीसह सासू-सासऱ्याने जमिनीसह वडिलांच्या नावावरील प्लॉट आमच्या नावावर करुन दे, म्हणून छाया हिला मारहाण केली. यावेळी गोरख याने छायाचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी दिनकर घोलप यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
तत्कालीन सहायक निरीक्षक जी. एन. पठाण यांनी तपास करुन दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारपक्षातर्फे सादर केलेला पुरावा व सहायक सरकारी वकील मंजुषा एम. दराडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी गोरख आगम यास कलम ३०४ ब भा.दं.वि प्रमाणे दोषी धरुन त्यास १० वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सासू- सासऱ्यांना कलम ४९८ अ अंतर्गत २ वर्ष शिक्षा व १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.