परळी वैजनाथ (बीड) - कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी शिवाजी नगर आरोग्य केंद्रावर तोबा गर्दी होत आहे. सकाळपासून लसीकरणासाठी नागरिक केंद्राबाहेर गर्दी करत आहेत. या केंद्रात बसण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लसीकरणासाठी नागरिकांना सुव्यवस्था देण्याची गरज आहे. मात्र प्रत्येक केंद्रावर आरोग्य विभागातील लोकच संभ्रमात असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाजी नगर येथील लसीकरण केंद्रावर तळपत्या उन्हात लसीकरनासाठी 45 वरील नागरिक व वयोवृद्ध तासन तास रांगेत उभे राहत आहेत. यातच ज्यांना रक्तदाब, मधुमेह आहेत. अशा व्यक्तीचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. कोणत्याही प्रकारे निवारा अथवा सावली मिळेल, अशी व्यवस्था नसल्याने गैरसोय होत आहे. याकडे परळी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे, लसीकरण करण्यासाठी आलेल्या जेष्ठांनी मत व्यक्त केले.