बीड - जिल्ह्यासह देशभरात 2012मध्ये गाजलेल्या अवैध गर्भपाताच्या गुन्ह्यातील आरोपी डॉ. सुदाम मुंडे सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. आरोपी डॉ. सुदाम मुंडे मागील अनेक महिन्यांपासून विनापरवाना परळी येथे दवाखाना चालवत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी शनिवारी रात्री पोलिसांच्या मदतीने डॉ. मुंडेच्या रुग्णालयावर छापा टाकला. यादरम्यान जे आढळले ते भयानक व चकीत करणारे असल्याचे डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
शनिवारी रात्री बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परळी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणे प्रमुखांना मुंडे हॉस्पिटलवर कारवाईसंदर्भात आरोग्य विभागाला मदत करण्याचे आदेश दिले. यानुसार डॉ. अशोक थोरात व त्यांची टीम परळीमध्ये दाखल झाली. ठरलेल्या नियोजनानुसार रात्री दहा-साडेदहाच्या वेळी मुंडे हॉस्पिटलमध्ये पोलिसांसह वैद्यकीय पथकाने प्रवेश केला. तेथे गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण बेडवर झोपलेले असल्याचे दिसले. याशिवाय गर्भपातासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य व गोळ्या-औषधांचा साठाही तेथे आढळला. वैद्यकीय पथकाने तेथील रुग्णांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवून दिल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले
डॉ. सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमध्ये जे पाहिले ते आश्चर्यचकित करणारे होते. कारण सुदाम मुंडेवर अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणात त्याला न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. त्यामुळे हॉस्पिटल चालवण्यासाठी लागणारी परवानगीही त्याला मिळालेली नाही. असे असताना देखील सुदाम मुंडे हॉस्पिटल चालवत होता. मिळालेल्या पुराव्याच्या आधारे मुंडेवर पुन्हा गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.
नऊ तास चालली कारवाई -
शनिवारी रात्री दहा वाजता आरोग्य विभागाच्या पथकासह पोलीस परळीच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये छापा टाकण्यासाठी गेले होते. ही कारवाई रविवारी पहाटे सहा वाजेपर्यंत चालल्याचे डॉ. थोरात यांनी सांगितले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कारवाईचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात हे स्वतः परळीत तळ ठोकून होते.