बीड - जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या दोन तरुणांचा उपचार न मिळाल्याने तडफडून मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. संबंधित व्हिडिओ हा बीड जिल्हा रुग्णालयातील असल्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी दुजोरा दिलेला आहे. या प्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील कल्याण-विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातात गणेश देशमुख, सचिन भोसले हे दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर सदरील रुग्ण खाटावर नव्हे तर खाली जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ पुढे आला होता. सदरील व्हिडिओ जिल्हा रुग्णालयातील असल्याच्या वृत्ताला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दुजोरा दिलेला आहे. या प्रकरणात संबंधित ड्युटीवर असलेल्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीमध्ये डॉ. शिंदे, डॉ. देशपांडे यांच्यासह अन्य एका सदस्याचा समावेश आहे.
येत्या दोन ते तीन दिवसात चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर दोषी असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक थोरात यांनी सांगितले आहे.