बीड- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले असून संचारबंदी सुरू आहे. मात्र, २० एप्रिलला अगोदरच्या आदेशांमध्ये सुधारणा करुन काही ठिकाणी लॉकडाऊन काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही गुरुवारी जिल्ह्यातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचे सुधारित निर्देश दिले आहेत.
या नवीन आदेशानुसार अनेक क्षेत्रांना लॉकडाऊनच्या नियमांमधून सवलत मिळणार आहे. कृषी क्षेत्रातील आयात निर्यातीसाठी आवश्यक सुविधा, बियाणे आणि फलोत्पादनातील उत्पादनाची तपासणीय प्रक्रिया करणाऱ्या घटकांना सवलत मिळाली आहे,
शेती आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या यंत्रांच्या सुट्या भागांची आणि साहित्यांची दुकाने, या गाडया दुरुस्त करणारी महामार्गावरील आणि ग्रामीण भागातील दुकाने, सर्व वाहनांचे पंक्चर दुरुस्त करणारी ग्रामीण भागातील दुकाने सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. शहरी भागातील ब्रेड उद्योग, दूध प्रक्रिया केंद्रे, पिठाच्या गिरण्या, डाळ मील इ. अन्नप्रकिया केंद्रेही सुरू करता येतील.
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १३ मार्च २०२० पासून लागू केलेला आहे. याकायद्यानुसार जिल्हाधिकाऱयांना जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी योग्य वाटणारे आदेश काढण्याचे पूर्ण अधिकार आहेत. त्यांच्या आदेशांचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह शिक्षेला पात्र असतील.