बीड- राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कोरोनाकाळात तीन महिन्यांसाठी अधिपरिचारिका व वॉर्डबॉय यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे परिचारिका व वॉर्डबॉय यांना कामावरून अचानक कार्यमुक्त केले जात आहे. या विरोधात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे बुधवारी परिचारिकांनी धरणे आंदोलन केले.
यावेळी आंदोलकर्त्यांकडून प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले. कोरोनाच्या अतिशय बिकट काळात आम्ही दीड महिना काम केले. आता रुग्ण संख्या कमी होत असल्याचे कारण सांगून, तीन महिन्यांची ऑर्डर असतांना आम्हाला दीड महिन्यातच घरी बसवल जात आहे. हा आमच्यावर अन्याय असून, आम्हाला आमचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
67 अधिपरिचारिका व 13 वॉर्डबॉय कार्यमुक्त-
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सर्वात मोठे कोवीड हॉस्पिटल उभारण्यात आले होते. या रुग्णालयात एक हजार बेडची व्यावस्था करण्यात आली होती. त्यानुसार या रुग्णालयामध्ये तीन महिन्यांसाठी अधिपरिचारीका व वॉर्डबॉय यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळे यातील 67 अधिपरिचारिका व 13 वॉर्डबॉय यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. याचा निषेध करण्यासाठी या अधिपकिचारिकांकडून लोखंडी सावरगावमधील कोविड हॉस्पिटलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.