केज (बीड) - येथील भाजपचे नेते रमेश आडसकर यांच्या मालकीच्या नवीन सुरू झालेल्या पेट्रोल पंपावरील डिझेल टाकीच्या झाकणाचे कुलूप तोडून दीड लाख रुपयाच्या डिझेलची चोरी झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील केज-कळंब रोडवर कमल पेट्रोलियम या नावाने भाजप नेते रमेश आडसकर यांचा एक महिन्यांपूर्वी पेट्रोल पंप सुरू झाला आहे. १ मे रोजी मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या दरम्यान चोरांनी पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीचे कुलूप तोडून त्याला मोटार लावून त्यातील डिझेल खेचून कॅनमध्ये भरले. ते एका वाहनात ठेवत असताना पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा करताच अज्ञात चोरटे १ लाख ४९ हजार १६७ रु. किंमतीचे १,७०० लिटर डिझेल प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये भरून ते वाहनात ठेवून केजच्या दिशेने पसार झाले.
या गडबडीत चोरट्यांनी ४१ प्लॅस्टिक कॅनमध्ये काढून घेतलेले सुमारे १,७०० लिटर डिझेल शेजारी शेतात ठेवले असल्याने ते मात्र वाचले. या बाबत पेट्रोल पंपाच्या मॅनेजरच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेबल रुक्मिण पाचपिंडे या तपास करीत आहेत.