बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीवर प्रचारादरम्यान हल्ला झाला. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बीडची कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे बीडचे पोलीस भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत. मी जाहीरपणे मागणी करतो की, बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व स्थानिक गुन्हे शाखेचे घनश्याम पाळवदे यांची बदली बीड जिल्ह्याच्या नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेर करावी, अन्यथा बीड जिल्ह्यात गुंडशाही फोफावल्याशिवाय राहणार नाही, असाही आरोप त्यांनी केला.
बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी धनंजय मुंडे यांनी तेरा गावांचा दौरा केला. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, बीडची पोलीस यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधली आहे. सारिका सोनवणे यांच्यावर हल्ला झाला. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांच्या समोरच काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना मारहाण करण्यात आली. ८ दिवसांपूर्वी परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा निर्घुण खून झाला. बिहार असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. ही परिस्थिती बीडचे पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे घनश्याम पाळवदे यांच्यामुळेच आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केवळ बीड जिल्ह्याच्या बाहेर नाहीतर मराठवाड्याच्या बाहेर करा, तेव्हाच बीड जिल्ह्यातील निवडणुका निर्भय वातावरणात पार पडतील, असे मत धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केले.
मागच्या आठवडाभरात घडलेल्या सर्व प्रकरणांची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत. सत्ताधाऱ्यांनी कितीही पोलीस आणि सत्तेचा गैरवापर केला तरी त्यांच्या गुंडगिरीविरुद्ध लोकशाही मार्गाने लढा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस विजय प्राप्त करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बीड जिल्ह्यातील सारिका सोनवणे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील सोशल मीडियावरून करत निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. बीड पोलीस सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत.