बीड : शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रविवारी (27 ऑगस्ट) बीडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार गटावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सभेत अजित पवार यांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली. राज्यातील नव्या राजकीय समीकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये पहिली जाहीर सभा झाली. (Ajit Pawar Beed Sabha) (Ajit Pawar in Beed) (Ajit Pawar on Sharad Pawar in Beed Sabha)
राजकारणात मित्र किंवा शत्रू नसतो : बीडकरांनी ठरवलं तर काय करू शकतात, हे सभेतून सिद्ध झालं. समाजकारण, राजकारण यांची सांगड कशी घालायची हे बीडकरांना चांगलंचं माहितीये, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी मला सांगितलं, बीडमध्ये एक सभा घ्यायची आहे. आम्ही सर्वांनी हा वेगळा निर्णय का घेतला हे सर्वांना सांगायचं आहे. राजकारण कशासाठी असतं हे बीडकरांना चांगलचं माहितीये. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्रही नसतो. भविष्यात बीड जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आम्ही काम करणार आहोत, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
महायुती सरकार जनतेचं : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. आपण महापुरुषांचा आदर करणारे लोक आहोत. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारानं आल्याला पुढं जायचंय. आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी, हे सरकार तुमचंच आहे. त्यामुळे तुमचे कामं करुन देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतून बीडच्या जनतेला दिलं.
देशात मोदींचा करिष्मा : बीड जिल्ह्यासाठी आम्ही पीक विमा काढणार नाही, असं काही कंपन्या सांगत होत्या. मग आम्ही सरकारच्या माध्यामातून 1 रुपयांचा पीक विमा काढण्यासाठी काम केलं. 1 रुपयांचा पीक विम्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 4.5 हजार कोटी रुपयांचा बोजा पडल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे. त्यांचा करिष्मा या पुरोगामी महाराष्ट्रासाठी उपयोगात आणला पाहिजे. विकासासाठी जगात अमेरिका, रशिया, चीननंतर भारताचा क्रमांक लागतो, असेही अजित पवार म्हणाले. आम्हाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे. चंद्रयान मोहिमेचं जगभरातून देशाचं कौतुक होतंय. बीड जिल्हा हा राजकीय मैत्रीचा जतन करणारा आहे. बीडमध्ये राजकीय वैर नव्हतं. दिवंगत गोपीनाथ मुंडे, दिवंगत विलासराव देशमुख वेगवेगळ्या पक्षात होते. तरी देखील त्यांची मैत्री जगप्रसिद्ध होती, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
शेतकर्यांना शक्य तितकी मदत : विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. कांद्याच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांना बीडला जाण्यास सांगितलं. सत्ता ही सर्वसामान्य माणसाची असते. शेतकर्यांना शक्य तितकी मदत देण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतलाय. 2 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचंही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -