बीड - जिल्ह्यातील गेवराई येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बीड तालुक्यातील बिंदुसरा येथील धरणात गुरुवारी दुपारी आढळून आला. त्यानंतर बीड नगरपालिकेच्या बचाव पथकाद्वारे मृतदेह बाहेर काढण्यात आला.
आत्महत्या की खून?
रंगनाथ विश्वनाथ शिंदे (45) रा.पांगरी रोड असे मृतदेह सापडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. बीड तालुक्यातील पाली येथील बिंदुसरा धरणामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नगरपरिषदच्या बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. रंगनाथ शिंदे हे गेवराई येथे जिल्हापरिषद शिक्षक होते. ते गेवराई येथून सोमवारी बेपत्ता असल्याची तक्रार गेवराई पोलिसात दाखल होती. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोनवणे, आनंद मस्के, रविंद्र जाधव, शिंदे, बाबर, डोंगरे यांच्यासह बचाव पथकाने मृतदेह पाण्याच्याबाहेर काढला. पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.
हेही वाचा - गोंदिया पोलिसांना १० वर्षापासून चकमा... अखेर छत्तीसगडमध्ये जेरबंद केला जहाल नक्षली