बीड- मनात जिद्द व कष्ट करण्याची तयारी असली की, जिथं गवत देखील उगवत नाही तिथे फळबाग फुलवता येते, हे दाखवून दिलय बीडचे प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी. डोंगराळ भागात पाच एकर क्षेत्रावर फळबाग फुलवण्याची किमया त्यांनी करून दाखवली आहे.
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील प्रगतशील शेतकरी कल्याण कुलकर्णी यांनी तीन वर्षांपूर्वी डोंगर माथ्यावरील पाच एकर क्षेत्रावर 1700 सीताफळाच्या झाडाची लागवड केली होती. या डोंगराळ भागात इतर कुठलंही पिक उगवून येईल याची शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत येथे कोणते पीक घ्यावे याचा विचार करून, अखेर कल्याण कुलकर्णी यांनी सिताफळ लागवड करण्याचा निर्णय घेतला. लागवडीच्या तीन वर्षानंतर यंदा त्यांनी सीताफळाचा पहिला बहार घेतला आहे. साधारणतः दोन ते तीन टन सिताफळ उत्पादन यंदा त्यांना झाले. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील बालाघाटाच्या परिसरातील सिताफळाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या सिताफळामध्ये इतर ठिकाणी आढळणाऱ्या सिताफळाच्या तुलनेत जास्त गर आढळून येतो. त्यामुळे या सीताफळाला मुंबईच्या बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर्षी कल्याण कुलकर्णी यांना दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न या सीताफळाच्या शेतीतून मिळण्याचा आंदाज आहे.
डोंगराच्या माथ्यावर तयार केले शेततळे
लागवड केलेल्या सीताफळांच्या झाडांना पाण्याची व्यवस्था म्हणून डोंगराच्या माथ्यावर शेततळे तयार करण्यात आले आहे. शेजारीच असलेल्या कुंडलिका धरणाजवळील विहिरीतून तयार केलेल्या शेततळ्यात पाणी साठवून ठेवले जाते. हे शेततळे डोंगराच्या माथ्यावर असल्यामुळे वीज नसतांनाही सिलाफळांच्या झाडाला थिबकच्या माध्यमातून पाणी सहज देता येते.