बीड - दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी बीड ग्रामीण पोलिसांनी पकडली होती. या टोळीतील २४ वर्षीय कुख्यात दरोडेखोराला न्यायालयीन कोठडीत कोरोनाची बाधा झाली होती. त्याच्यावर बीड येथील आयटीआय कॉलेजच्या कोविड कक्षात उपचार सुरु असताना पोलिसांची नजर चुकवून तो पसार झाला होता. तीन आठवड्यानंतर त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. औरंगाबाद जिल्ह्यात बारा किमी अंतरापर्यंत पाठलाग करुन त्याला बेड्या ठोकण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
१४ जुलै रोजी पहाटे बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे व सहकाऱ्यांनी माळापुरी ते कुर्ला रोडवर एका कारमधून दरोडा घालण्याच्या तयारीत निघालेल्या पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले होते. यावेळी आरोपींकडून घातक शस्त्र जप्त करण्यात आली होती. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. या दरम्यान टोळीतील २४ वर्षीय आरोपी (रा. रामगव्हाण, ता. अंबड, जि. जालना) हा कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी बीडच्या आयटीआय कॉलेजच्या कोविड कक्षात ठेवण्यात आले होते. २५ जुलै रोजी त्याने पोलिसांची नजर चुकवून कोविड कक्षातून पलायन केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्या फरार दरोडेखोराच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन केले होते.तीन आठवड्यांपासून त्या दरोडेखोराचा शोध सुरु होता. अखेर सोमवारी पथक गेवराईत शोध मोहिमेवर असताना त्यांना सदरील आरोपी औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड तालुक्यात डोणगाव टाका शिवारात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने सदरील ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांना पाहताच गायरानात लपलेल्या आरोपीने पुन्हा पळ काढला, परंतु पथकातील कर्मचाऱ्यांनी तब्बल बारा किमी पायी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, कोविड कक्षातून पलायन केल्यानंतर त्याच्यावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यामुळे त्यास तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक भास्करराव सावंत, गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, कर्मचारी तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, विकी सुरवसे, चालक संतोष हारके यांनी ही कारवाई केली.
पळालेल्या दरोडेखोरावर १७ गुन्हे दाखल
२४ वर्षीय कुख्यात दरोडेखोरावर बीडसह जालना,अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांत तब्बल १७ गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. दरोड्यासह लुटमारीचे गुन्हे करुन त्याने दहशत निर्माण केली होती. कोरोनाबाधित सराईत गुन्हेगार पसार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर त्यास पुन्हा जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश मिळाले. सुरक्षित अंतर ठेऊन ताब्यात घेत त्यास बीडला आणण्यात आले.