परळी (बीड) - अखिल भारतीय किसान सभा व माकपाच्या वतीने महागाई व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरुवारी परळी तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. कोरोनाशी सामना सुरू असतानाच या संकट शृंखलेत महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असताना सरकार 'अच्छे दिनाचे' स्वप्न दाखवत जनसामान्यांच्या जखमेवर फुंकर मारण्याचे निमित्त साधून घावावर घाव घालत आहे, अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
कृषी सुधारणा कायद्यांच्या नावाखाली शेती, शेतकरी विरोधी अडेलट्टटू दूराग्रही धोरणांचा एकीकडे कळस गाठलेला असतानाच दुसरीकडे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर असंवेदनशीलपणे खतांच्या किंमतींचा नियोजनाअभावी उडवलेला गोंधळ तसेच खरीप हंगामासाठी योग्य किंमतीत पुरेसे खत व दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. भ्रष्टाचाराला आळा घालावा, पीकविमा वाटप व याची सक्षम अमलबजावणी करून नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, लाॅकडाऊनच्या काळात थकलेली वीज बिलं विनाशर्त माफ करावीत. वृद्ध, अपंग, निराधार, विधवा, परितक्त्या यांना लाॅकडाऊन काळात घोषित केल्याप्रमाणे मदत करावी. ही मदत प्रत्येकी ३००० हजार रुपये असावी, दुध उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवावी व दुधाला योग्य दर द्यावा तसेच वाण धरणावरील बंद काळातील पंपाचे वीज बिल माफ करावे याशिवाय सर्व नागरिकांचे मोफत व होता होईल तेवढे लवकर लसीकरण करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा बीड जिल्हा कमिटीने गुरुवारी परळी तहसील कार्यालयावर आंदोलन केले. यावेळी प्रशासनच्यावतीने पेशकार विठ्ठल जाधव, पेशकार शेख सलीम यांनी शिष्ट मंडळाशी चर्चा करून निवेदन स्वीकारले. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य काॅ. पी. एस घाडगे, सिटुचे जिल्हाध्यक्ष कॉ. बी.जी.खाडे, किसान सभेचे कॉ. पांडुरंग राठोड, काॅ. मुरलीधर नागरगोजे, माकचे तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, पंचायत समिती सदस्य काॅ. सुदाम शिंदे, कॉ. किरण सावजी, कॉ. अश्वीनी खेत्रे, काॅ. मनोज स्वामी, काॅ. प्रविण देशमुख, अण्णासाहेब खडके, अंकुश उबाळे, कॉम्रेड अशोक नागरगोजे, कॉ. राधाकिशन जाधव, महादेव शेरकर, अनुरथ गायकवाड आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.