धारूर (बीड) - येथील कोविड तपासणी केंद्रावर एका तरुणाची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आली. परंतु कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधत तो तरुण तिथून निसटला आणि रूग्णालयाबाहेर आला. हा प्रकार लक्षात येताच रुग्णालय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, थोड्याच वेळात नातेवाईकांनी त्या तरुणाला रुग्णालयात आणून सोडले. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा होत आहे.
धारूर येथील एका खाजगी डॉक्टरने तांदुळवाडी येथील ३९ वर्षीय तरुणास लक्षणे असल्याने कोरोना चाचणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते. शुक्रवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान त्याची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूला थांबण्यास सांगितले. लोखंडी सावरगाव येथे त्याला पुढील उपचारासाठी नेण्यात येणार होते. यानंतर सर्व कर्मचारी संशयितांच्या कोरोना चाचणी करण्यात व्यस्त झाले. येथे अपुरे कर्मचारी असल्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाकडे कोणाचे लक्ष नव्हते. याचाच फायदा घेत तो तरुण थेट रुग्णालयाच्या बाहेर आला.
काही वेळाने कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली आणि त्यांच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईकांनी लागलीच त्याचा शोधून काढत रुग्णालयात आणून सोडले. यानंतर त्याला लोंखडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरला रवाना करण्यात आले. मात्र, या सर्व प्रकारामुळे रुग्णालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - सौताडा धबधब्यावरुन उडी मारून 17 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; कारण अस्पष्ट
हेही वाचा - खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचीही होणार कोरोनाचाचणी