बीड - यंदा धुळवडीच्या दिवशी खेळण्यात येणाऱ्या रंगाच्या खेळाचा 'कोरोना व्हायरस'च्या प्रादुर्भावामुळे बेरंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरवर्षी बाजारात रंग घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते. मात्र, यंदाच्या वर्षी ग्राहकांनी रंगांकडे पाठ फिरवली आहे. तसेच कोरोनाचा प्रभाव असल्याने नव्या पिचकाऱ्यांचीही विक्री झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. तर तरूणांनी यंदा नैसर्गिक रंग वापरणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - महिला दिन विशेष : 40 कंपन्यांचे नेतृत्व, 7 हजार हातांना रोजगार; असा आहे बीडच्या या 'सुपरवुमन'चा प्रवास
होळी सणाच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात ठिक-ठीकाणी रंग खेळला जातो. मात्र, यंदा कोरोना विषाणूची भीती असल्याने रंग खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. रंग हे चीनमधील असल्यामुळे नागरिकांनी रंग घेण्याचे टाळले आहे. दरम्यान, भारतात येणाऱ्या अधिकतर पिचकाऱ्यांची आयातही चीनमधून केली जाते. त्यामुळे यंदा रंगपंचमीवर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येत आहे.