बीड - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बीडचे राजकिशोर मोदी यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळाले होते. मात्र, अचानक काँग्रेसने बीडला डावलले आहे. राजकिशोर मोदी यांच्या रूपाने बीडला मिळणारी आमदारकी आता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे बीडवर व काँग्रेसचे निष्ठावंत असलेले राजकिशोर मोदी यांच्यावर अन्याय झाला असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.
आघाडीच्या राजकारणात काँग्रेसच्या पारड्यात एकच उमेदवारी पडल्यानंतर काँग्रेसने बीडला डावलले असून राजकिशोर मोदी यांना माघार घ्यावी लागत आहे. काँग्रेसने राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्य विधान परिषदेच्या नऊ जागांसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसने राजेश राठोड जालना आणि राजकिशोर मोदी बीड यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, निवडणूक बिनविरोध करण्याचा हट्ट शिवसेनेचा असल्याने काँग्रेसला एक उमेदवार मागे घ्यावा लागत आहे. काँग्रेसने राजेश राठोड यांची उमेदवारी निश्चित केल्याने आता राजकिशोर मोदी यांना माघार घ्यावी लागेल.
विधान परिषदेमधून बीडच्या एका काँग्रेस कार्यकर्त्याला संधी मिळणे तसे दुरापास्त आहे. राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून यावेळी तशी संधी मिळाली होती. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याकडे आघाडीतील वरिष्ठ नेत्यांचा कल आहे. याचा परिणाम काँग्रेसला एक उमेदवारी मागे घेणे भाग पडले. यामध्ये काँग्रेसने बीडला डावलले आहे. याचा परिणाम स्थानिक काँग्रेस समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळाले.